राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या वेगाने निर्णय घेत आहे ते पाहता नायक चित्रपटामधील प्रमुख व्यक्तीरेखेशी तुलना केली जात असल्याचं मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गडचिरोली दौऱ्याचा संदर्भ देत मुनगंटीवार यांनी अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटाचा उल्लेख केलाय. या चित्रपटामध्ये एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेला शिवाजीराव गायकवाड (अनिल कपूर) वेगाने निर्णय घेत लोकांच्या हिताची कामं करताना दाखवण्यात आलंय.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी सध्याच्या सरकारची स्थिती ही अतिदक्षता विभागातील रुग्णाप्रमाणे असल्याने ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीत अशी टीका केलीय. तसेच पालकमंत्री नसल्याने लोकांचे अश्रू पुसायला कोणी नाहीय. तसेच नाताबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे चार तास आहेत तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला त्यांच्याकडे वेळ नाही”, असा संदर्भ देत पत्रकारांनी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी, “महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचा दौरा पहिलाच दौरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपला हा पहिलाच दौरा या नेत्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केला. त्यांनी तातडीने निर्णय घेतले,” असं सांगितलं.
