ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकेनंतर आता अंबरनाथमध्येही शिंदे गटाने ठाकरेंना दणका दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेमधील २० नगरसेवक आणि २ स्वीकृत नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहे. एकूण २२ नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना खिंडार पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर राज्यभरातून अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेला शिंदेंनी झटका दिलाच. मात्र पुणे, सोलापूर या भागातही धक्के दिले.
ठाणे महागनरपालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतरकल्याण-डोंबिवलीतील बहुसंख्य नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा दर्शवला. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरेदेखील शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. राज्यातील आमदार, खासदारांनी बंड केल्यानंतर त्याच्या पडसाद आता स्थानिक पातळीवरही पाहायला मिळत आहेत, असंच म्हणावं लागेल.
ठाण्यात काय चित्र?
थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
