करोना आणि टाळेबंदीमुळे खंडित झालेल्या प्लास्टिकबंदीच्या मोहिमेला लवकरच पुन्हा सुरुवात होणार आहे. एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या व घातक प्लास्टिकच्या विरोधातील कारवाई जोमाने करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंड आकारला जाऊ शकतो.
मुंबईत येत्या १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिकबंदीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागातर्फे कारवाईचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या पथकांच्या धर्तीवर नवी पथके सज्ज करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिकेने निरीक्षकांची पथके तयार केली होती. मार्केट, दुकाने व आस्थापना आणि परवाना अशा तीन विभागांतील निरीक्षकांचा या पथकात समावेश करण्यात आला होता. त्यांना विशिष्ट गणवेश देण्यात आला होता. तशीच पथके तयार करण्यात येणार असून विविध ठिकाणची दुकाने, बाजारपेठा, मंडया, फेरीवाला क्षेत्र अशा ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे.
