आठ दिवसात पाणी कपातीचा निर्णय

एका बाजूला  धरणातील पाणी साठा कमी होत आहे, तर दुसरीकडे अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींमुळे चिंता वाढू लागली आहे. मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावू लागला आहे. परिणामी, पाणी कपात लागू होण्याची दाट शक्यता आहे. येत्या आठ दिवसात जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत असून सातही धरणात मिळून सध्या केवळ ९.७६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. पावसाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे अखेर पाणी कपातीच्या निर्णयाची चर्चा जल अभियंता विभागात सुरू झाली आहे. हवामान विभागाचे अंदाज चुकत असून सर्वसामान्य नागरिक आणि जल अभियंता विभाग पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

मात्र पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. येत्या काही दिवसात पाऊस पडला तरी धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय होऊन प्रत्यक्ष पाणीसाठा वाढण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत ९ टक्के पाणीसाठा अपुरा पडू शकतो. त्यामुळे किमान १० टक्के पाणी कपात किंवा पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठ दिवसात जलसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *