विवाहित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ; तसेच घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी करुणा शर्मा हिच्यासह स्वीय सहायकाला येरवडा पोलिसांनी मुंबईत मंगळवारी अटक केली. घटस्फोटासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अजयकुमार विष्णू देडे (वय ३२, रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद) आणि त्याची मैत्रीण करुणा शर्मा हिच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक नातेसंबंधांचे आरोप केल्यापासून करुणा शर्मा प्रकाशझोतात आल्या आहेत.
याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे; तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि देडे यांची काही वर्षांपूर्वी लग्न झाले. फिर्यादीत म्हटल्य़ाप्रमाणे देडे याचे करुणा शर्मा हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने घटस्फोटासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पती आणि करुणा यांनी संगनमत करून फिर्यादीला त्रास देण्यास सुरुवात केली. करुणा हिने फिर्यादीस धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीने घटस्फोट द्यावा, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात फिर्यादीचा पती आणि करुणा शर्माला पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. फिर्यादीचा पती आणि करुणा शर्मा यांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून अॅट्रोसिटीसारखा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हॉकी स्टीक आणि गाडी जप्त करायची आहे, तसेच या गुन्ह्यात इतर कोणी आरोपी आहे का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती फिर्यादींचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केली. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. रेश्मा सोनार-मोकाटे यांनी आरोपीच्या पत्नीने दिलेली फिर्याद पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी आणि करुणा शर्माला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
