सातारा जिल्ह्यातून सोलापुरात विक्रीसाठी आणलेली पाच देशी बनावटीची पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे सोलापूर शहर पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी संबंधित चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांना एक तरूण अक्कलकोट रस्त्यावर एक देशी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी अक्कलकोट रस्त्यावर एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा लावला होता. या सापळय़ात दुचाकीस्वार प्रवीण राजा शिंदे (वय ३०, रा. वडूज, ता. कराड, जि. सातारा) या तरुणाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवाणू काडतुसे सापडली. याप्रकरणी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून केलेल्या पुढील तपासात त्याचे आणखी तीन साथीदारांचा सहभाग आढळून आला. त्यानुसार स्वरूप विजय पाटील (रा. तांबवे, ता. कराड) याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे तर अमोल ऊर्फ पप्पू विलास खरात (रा. दहिवडी, ता. माण) याच्याकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
तसेच ओंकार ऊर्फ रावडी जालिंदर देशमुखी (रा. सातारा) याच्याकडून दोन पिस्तुले हस्तगत करण्यात आली. एकूण पाच देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त करता आली.
