समृद्धी महामार्गावर चार दिवसांत दोन अपघात, दोघांचा मृत्यू

 मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम रखडले असतानाच आता हा महामार्ग लोकापर्णाआधीच जीवघेणा ठरत आहे. महामार्गाच्या काही टप्प्यातील काम पूर्ण झाले असून या मार्गावरून बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीवर कुठलेही नियंत्रण नसल्याने या चार दिवसांत येथे दोन अपघात झाले असून यात दोघांचा बळी गेला आहे. या अपघातांमुळे तयार झालेल्या  आणि काम सुरू असलेल्या मार्गावरून होणारी बेकायदा वाहतूक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आता एमएसआरडीसीने कडक पावले उचलत समृद्धीवरून बेकायदा वाहने चालविणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गाचा २१० किमीचा मार्ग तयार आहे. मात्र यातील केवळ एका उन्नत मार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या २१० किमीचे लोकार्पण रखडले आहे.  ज्या भागातील काम पूर्ण झाले आहे त्या भागामधील कंत्राटदार निघून गेले आहेत. रस्ते मोकळे असून तिथे केवळ सुरक्षा रक्षक आहेत. रस्त्यांवर अडथळे लावण्यात आले आहेत. मात्र रस्ते मोकळे असल्याने या मार्गावरून बेकायदा वाहतूक केली जात असून मागील काही दिवसांत याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस काम सुरू असलेल्या मार्गावरूनही बेकायदा प्रवास केला जात असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *