धुळ्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार, भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं

सामाजिक प्रतिष्ठेने अजून एका तरुणीचा जीव घेतला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साक्री तालुक्यातील हट्टी गावामध्ये भावानेच आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत आरोपी भावाला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या हट्टी गावांमध्ये रमेश हालोर यांचं कुटुंब रहातं. रमेश यांची मुलगी पुष्पा हीचं एक तरुणावर प्रेम होतं. पुष्पाला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न करूनही ती प्रियकराला सोडायला तयार नव्हती. अशातच ती घरातून निघून गेली. पुष्पा घरातून निघून गेल्याने त्याचा भाऊ संदीप हालोर संतापला.

त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पुष्पाचा शोध सुरू केला. समाजात प्रतिष्ठा मातीत मिळणार या विचाराने त्याच्या डोक्याचा सैतानाने ताबा घेतला होता. पुष्पाच्या प्रेमाला संदीपचा प्रखर विरोध होता. संदीप कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचं लक्षात आल्यावर पुष्पाने घर सोडलं. संदीपने आपल्या मित्रांच्या मदतीने पुष्पाला शोधून काढले.

आपण घरी जाऊया, असं त्याने सांगून पुष्पाला मोटरसायकलवर बसवले. मात्र शिवमेंढा इथं अर्ध्या वाटेत त्याने दुचाकी थांबवली. निर्जन स्थळी एका टेकडीसारख्या ठिकाणी संदीप हा पुष्पाला घेऊन गेला. तिच्या साडीचं एक टोक त्याने तिथल्या झाडाला बांधलं आणि दुसरं टोक पुष्पाच्या गळ्याभोवती बांधून तिला उंचावरुन ढकलून दिलं. यात गळफास लागून पुष्पाचा मृत्यू झाला. पुष्पाचा जीव जात नाही तोपर्यंत संदीप त्याच ठिकाणी झाडाजवळ उभा होता. पुष्पाचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्याने आपलं घर गाठलं.

बहिणीची हत्या करून घरी परतलेल्या संदीपने घरच्यांची दिशाभूल केली. पुष्पाने आत्महत्या केल्याचं त्याने घरच्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. पण पुष्पाच्या प्रेम प्रकरणामुळे कुटुंबाची अब्रू गेली आहे. अजून पोलिसांना बोलून समाजात प्रतिष्ठा मातीमोल करायची नाही, असं सांगत संदीपने पुष्पाचे अंत्यसंस्कार केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता आपण बहिणीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. बहिणीचं प्रेमप्रकरण असल्याने आपण संतापाच्या भरात तिला संपवल्याचं संदीपने सांगितलं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *