पंढरपूर वारीसाठी एसटीच्या ४,७०० गाडय़ा

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी एसटी महामंडळातर्फे ४ हजार ७०० विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाडय़ा ६ ते १४ जुलैदरम्यान धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळय़ासाठी (८ जुलै रोजी) दोनशे गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. करोना संसर्ग कमी झाल्याने दोन वर्षांनतर वारी सोहळा होणार आहे. भाविकांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर घरी आणून सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. त्यामुळे पंढरपूर यात्रेसाठी ४,७०० गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद प्रदेशातून १,२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके

वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी वारीच्या कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभी करण्यात येणार आहेत. दरम्यान, या काळात बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *