नागपुरातील एटीएमची कमाल! ५०० ऐवजी निघायचे अडीच हजार; पैसे काढण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी

देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, असं म्हणण्याची वेळ नागपूरातील खापरेखेडा गावकऱ्यांवर आली आहे. बँकेच्या एटीएममधून ५०० रुपये काढायला गेल्यावर थेट २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हातात येत आहे. या प्रकारामुळं गावकऱ्यांनी या एटीएममधून पैसै काढण्यासाठी एकच गर्दी केली होती.

खापरखेडा गावातील शिवा कॉम्पलेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्येच ही किमया घडत होती. अशाचप्रकारे अनेक तरुणांना ५०० रुपये काढताना मशीनमधून अडीच हजार रुपये मिळत होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी एटीएम सेंटर काहीवेळासाठी बंद केले.

सिल्लेवाडा येथील एका तरुणाने एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून दहा हजार रुपये काढले. पैसे काढून परत जात असताना एका युवकाने त्याला थांबवले. ५०० रुपये दे तुला एक हजार देतो, असं सांगितले. तरुणाने त्याला एक हजार रुपये दिल्यानंतर तो युवक अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये गेला. एटीएएममधून तो अडीच हजार काढून घेऊन आला. त्यातील एक हजार रुपये त्याने त्या तरुणाला दिले.

तरुणाने त्याला हा काय प्रकार आहे, असे विचारताच त्याने अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये नेऊन त्याला सगळा प्रकार सांगितला. तसंच, त्याला २ हजार ५०० रुपये काढूनही दाखवले. दरम्यान, ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.

मध्यरात्रीनंतर ही बातमी नागपूर, कोराडी आणि खापरखेडा या गावात पसरली. तेव्हा युवकांनी पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरकडे धाव घेतली. पैसे काढण्यासाठी अनेक उत्साही तरुण एटीएम सेंटरकडे आले. मात्र, तिथे आधीच पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तातडीचे एटीएम सेंटर बंद केले व तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी बुधवारी एटीएम मशीनची तपासणी केली. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारे किती पैसे काढले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसंच, पैसे काढल्यानंतर मोबाइलवर बँकेतून मेसेजही नागरिकांना आला नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *