जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.
