भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या सुमारे दोन हजारांनी वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 7240 नवीन रुग्ण आढळले आहेत तर बुधवारी सुमारे पाच हजार रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच कालच्या तुलनेत ही संख्या 38.4% ने वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 2,701 रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोना विषाणूची एकूण प्रकरणे 4,31,97,522 पर्यंत वाढली आहेत तर सध्या 32,498 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
गेल्या 24 तासात अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 3,641 ने वाढ झाली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5,24,723 झाली आहे. देशात तिसरी लाट आल्यापासून नवीन प्रकरणांची संख्या जवळजवळ शुन्यच होती. बुधवारी 93 दिवसांत प्रथमच देशात 5,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. आता हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे की हे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे (COVID 4th wave) तर लक्षण नाही ना..!
चौथी लाट 22 जूनपासून सुरू होऊन 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहू शकते असे त्यांनी सांगितले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रकरणे पाहता करोनाची चौथी लाट केव्हाही येऊ शकते असे वाटू लागले आहे.
देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेत ओमिक्रॉन व्हेरिएंटनेच सर्वाधिक विनाश माजवला होता. त्याची लक्षणे गंभीर नव्हती. पण सध्या ओमिक्रॉनचे अनेक सबव्हेरिएंट जसे की ba.4 आणि ba.5 अनेक देशांमध्ये चौथी लाट निर्माण करत आहेत. भारतातही याच्या काही केसेस आढळल्या असल्या तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे.
ओमिक्रॉन बीए.4 आणि बीए.5 ने धोका आहे का?
ओमिक्रॉनच्या या सबव्हेरिएंट्सची फार कमी प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. अर्थात, त्यांच्यात कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरण्याची क्षमता आहे, परंतु जर आपण लक्षणांबद्दल बोललो तर ती फारसे गंभीर नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने या गोष्टींना ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ मानलं नाहीये.
ही लक्षणे चुकूनही करू नका दुर्लक्षित
कोरोनाचे व्हेरिएंट्स बदलल्याने त्याची लक्षणेही बदलली आहेत. शिंका येणे, खोकला, तीव्र ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या, मळमळ आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
