पैशांच्या लालसेपोटी मालकाचे १० लाख रुपये लाटले; आरोपी सापडला कोलकात्त्यात

शहरातील बांधकाम व्यावसायिक सुभाष पाटील यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराने कंत्राटदारास देण्यासाठी दिलेल्या तीन धनादेशांपैकी एका धनादेशाचा अपहार केला. या धनादेशावर सेल्फ असे लिहून त्याने मालकाच्या बॅंक खात्यातून १० लाख रुपयांची रक्कम काढून तो कोलकात्ता येथे पसार झाला. या विषयी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा चोवीस तासांत शोध धेत त्याला कोलकात्ता येथून अटक केली आहे.

सुभोजित बिसवास (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४ लाखांचे सोन्याचे दागिने व ५ लाखांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.

डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक सुभाष पाटील यांच्याकडे सुभोजित हा कामास आहे. त्याच्याकडे एका कंत्राटदारास देण्यासाठी तीन धनादेश देण्यात आले होते. यातील एक धनादेश स्वतःसाठी ठेवत त्याने दोनच धनादेश कंत्राटदारास दिले. कंत्राटदाराने एका धनादेश विषयी सुभाष यांच्याकडे चौकशी केली असता सुभाष यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ऑफिसमध्ये चौकशी केली असता दोन दिवसांपासून सुभोजित हा ऑफिसमध्ये आला नसल्याचे समजले.

संशय आल्याने सुभाष यांनी बॅंकेचे खाते तपासले असता खात्यातून १० लाख रुपये काढले असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत ३१ मे रोजी सुभोजित याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास केला असता तो मुळचा बंगालचा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन चेक केले असता ते कोलकत्ता येथे आढळून आल्याने तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शिवाजी राठोड यांचे पथक कोलकत्ता येथे रवाना झाले. मात्र तेथे गेल्यावर आरोपीचा फोन बंद असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा नविन मोबाईल नंबर शोधून काढून पोलिसांनी कोलकत्ता येथील हॉटेल व्ह्यू पार्क येथून सापळा रचत सुभोजित याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *