नाशिकमध्ये तीन वर्षीय बालकाला करोनाची लागण झाल्याचा संशय; रुग्ण व्हेंटिलेटरवर

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पुन्हा रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन वर्षीय बालकाला संसर्गाचे निदान होण्याची शक्यता असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांनी शनिवारी दिली.

नाशिकमध्येही रोज हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बाधित रुग्ण दाखल होत आहेत. मात्र, हे रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका बालकाला करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या बालकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान शनिवारी शहरात, ग्रामीण भागात आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. महात्मानगरमध्ये एक, तर ग्रामीण भागात त्र्यंबकेश्वर येथील बालकाला करोनाचे निदान झाले आहे. याशिवाय हरयाणातून नाशिकमध्ये आलेल्या एका रुग्णासही करोनाचे निदान झाले आहे. दिवसभरात एका रुग्णाने करोनावर मात केली असून, सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी १४ रुग्ण नाशिक शहरातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *