दादर स्थानकातील पादचारी पुलावरील गर्डर आणि ठाकूर्ली स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे आज, शुक्रवारपासून रात्रकालीन ब्लॉक घेणार आहे. भायखळा ते माटुंगा जलद मार्गावर आणि कल्याण ते दिवा दरम्यानही धीम्या, जलद चारही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२.४० ते पहाटे ६ पर्यंत भायखळा ते माटुंगा अप, डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेऊन काम होणार आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. इंद्रायणी एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावेल. तर सीएसएमटीतून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या जलद लोकल या दोन स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरुन चालवण्यात येतील. ४ जूनला भायखळा ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यात डाऊन जलद लोकल भायखळा ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. तर याच दिवशी मध्यरात्री सव्वा एक ते पहाटे ३.३५ पर्यंत कल्याण ते दिवा अप, डाऊन जलद, धीम्या मार्गावर होणाऱ्या ब्लॉकमुळे सीएसएमटीतून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल रात्री ११.५१ पासून ते मध्यरात्री १२.२४ पर्यंत जलद मार्गावर धावणार आहेत. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा नसेल.
