सीएनजीच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या काळय़ा-पिवळय़ा रिक्षा, टॅक्सीचालकांना लवकरच भाडेवाढीचा दिलासा मिळणार आहे. भाडेवाढ विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. वाहनचालकांशी संबंधित सहा फेसलेस सेवांचे लोकार्पण चर्चगेट येथील परिवहन आयुक्त कार्यालयात परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाडेवाढीविषयी माहिती देण्यात आली. रिक्षासाठी किमान दोन रुपये आणि टॅक्सीसाठी तीन ते चार रुपयांनी भाडेवाढ करण्याचा विचार परिवहन विभाग करीत आहे.
२५ ऑगस्ट २०२१ ला प्रति किलोग्रॅम सीएनजीचा दर ५१ रुपये ९८ पैसे होता. दिवसेंदिवस या दरात वाढ होत आहे. सातत्याने सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सीचे भाडे वाढवण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. सध्या सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ असून त्यामुळे परिवहन विभागाने टॅक्सी दरात किमान पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. मार्च २०२१ ला टॅक्सीचे भाडे २२ रुपये आणि रिक्षाचे भाडे २१ रुपये झाले होते. यामध्ये तीन रुपयांची वाढ केली होती. आता टॅक्सीचे भाडे २५ रुपये असून यात आणखी किमान तीन ते चार रुपयांची वाढ करण्याचा विचार आहे. तर रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी वाढवण्यात येईल. या संदर्भात जून महिन्यात मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निर्णय घेण्याची शक्यता आहे.
रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ विचाराधीन आहे. रिक्षा, टॅक्सी संघटना, तसेच परिवहन विभागातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावर अंतिम निर्णय होईल.
