तर घरात घुसून बदडून काढू… भाजपचा दीपाली सय्यद यांना इशारा

भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेवरुन अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दीपाली सय्यद यांनी थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. यावर आता भाजप महिला नेत्याही आक्रमक झाल्या आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी दीपाली सय्यद यांची ही सर्व उठाठेव सुरु असल्याची टीका भाजप नेत्या उमा खापरे  यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी उमा खापरे यांनी केली आहे. तसंच यापुढे दीपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द वापरला तर आम्ही दीपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू असा इशाराही उमा खापरे यांनी दिला आहे.

दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही उमा खापरे यांनी दिला असून शिवसेनेची लोकं जाणीवपूर्वक खुसपट काढण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींवर टीका करताना दीपाली सय्यद यांची जीभ घसरली होती.  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली होती.

तसंच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली होती. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ असं वादग्रस्त वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

याआधीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांनी टीका केली होती. ‘किरीट सोमय्यांच्या जागी मोदी जरी असते तरी गाडी फुटली असती’ अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *