टोमॅटोनंतर आता कोथिंबीर महागली, एका जुडीसाठी मोजा ४०-५० रुपये

उन्हाचा फटका बसल्याने येथील कृषी बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर प्रति किलो १०० रुपयाच्या घरात गेले आहेत. त्यातच आता कोथिंबिरीचे भावही वाढले आहेत. सध्या कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी घाऊक बाजारात ३० रुपये मोजावे लागत असून अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात कोथिंबीर जुडीचा भाव ४० ते ५० रुपयांवर गेला आहे.

मुंबई बाजारातील कोथिंबिरीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज दोन ते अडीच लाख कोथिंबिरीच्या जुड्या पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र सध्या बाजारात दीड ते पावणेदोन लाख कोथिंबीर जुड्या येत आहेत. ४० ते ४५ गाड्यांवर असलेली हिरव्या मिरचीची आवकही आता ३० ते ३५ गाड्यांवर आली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सरासरी ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ५० ते ६० रुपये किलो झाली आहे. कोथिंबीर व हिरवी मिरची महागल्याने दहा रुपयांत मिळणाऱ्या हिरव्या मसाल्यासाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत. टोमॅटो केवळ मुंबई व परिसरातच महागला नसून राज्यात इतरही काही ठिकाणी तो महागला आहे. औरंगाबादेत टोमॅटोचा भाव ८० ते ९० रुपये किलो झाला आहे. त्याचवेळी आवक वाढल्याने औरंगाबादेत कांद्याच्या दरात घसरण कायम असून ८ ते १२ रुपये किलो या दराने त्याची विक्री होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *