एमएमआरडीएने 13.9 किमी लांबीच्या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत (छेडा नगर ते आनंद नगर) गजबजलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सेगमेंट लाँचरचे प्रत्येकी 59 मीटर लांबीचे आणि 160 मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लाँचरचे दोन भाग यशस्वीरित्या उभारत आणखी एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
ही संपूर्ण जटिल प्रक्रिया करण्यासाठी 18 ते 24 तासांचा कालावधी लागतो ते काम अवघ्या 4 तासांत पूर्ण करण्यात आलं. उत्कृष्ट नियोजन, काटेकोर सुरक्षा उपाययोजना आणि एमएमआरडीए व मुंबई वाहतूक पोलिसांमधील समन्वयामुळे ही कामगिरी यशस्वीपणे पूर्ण झाली.
आता पुढे काय?
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सेगमेंट लाँचरद्वारे आता 1,632 प्रीकास्ट सेगमेंट्सची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे 90 मेट्रिक टन असून त्याद्वारे 25 मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाईल. यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग मिळून प्रकल्प पुढील महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करेल.
आणि मुंबईसाठी याचा अर्थ काय?
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प म्हणजे आनंद नगर, ठाणे ते छेडानगर, घाटकोपर यांना जोडणारा 13.9 किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत 6-पदरी हाय-स्पीड कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण होण्यास मदत होऊन प्रवास अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या 25-30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम होईल.
ठाणे ते घाटकोपर प्रवास वेगवान होणार
उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पामुळं पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुककोंडी कमी करण्यास मगत होण्याची अपेक्षा आहे. दक्षिण मुंबई ते ठाणे हा प्रवास 25-30 मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. त्यामुळं महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
