नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या तरुण, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने 23 जुलैला मुंबई बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधी पक्षांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. बड्या राजकीय पक्षांशी अद्याप चर्चा झाली नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. मात्र स्थानिक पातळीवरील संघटना आमच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
भाजप विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आम्ही कधीही परवानगी मागितली नाही. शांततेंत आंदोलन करणं माझा अधिकार असंही त्यांनी सांगितलं आहे.
काय राहणार बंद?
प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली असली तरी यामध्ये अजून कोणते पक्ष सहभागी होतात यावरुन त्याची व्याप्ती ठरेल. जर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आणि वंचितसह इतर पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो. शाळा, कार्यालयं बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय प्रशासन एक दिवस आधी घेऊ शकतं.
मंत्रालयाशिवाय कुठेही कलम ३७(२) ३७(३) कुठेही लागू नाही . लोकांनी स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावं. लोकांनी कामाला जाऊ नये, दुकान उघडू नये, ओला-उबर बंद ठेवावी. बस चालकांनी त्यांच्या बसेस बाहेर काढू नयेत ही आमची अपेक्षा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
