देशात पुन्हा एकदा मान्सूनने सक्रीय झाला आहे. पुढील 4-5 दिवसांत देशात मुसळधार पाऊस होणार आहे. या दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे. पुणे घाट माथ्यावरही पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतावर सध्या अनेक हवामान प्रणाली सक्रिय आहेत. तसेच पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागर व लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावरील वरच्या वातावरणातील चक्रीय परिसंचरण पासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या द्रोणीरेषेमुळे (Trough) महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय ते जोरदार अवस्थेत राहण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासांत पुणे घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची, तर पुणे शहरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये (मुंबईसह) आणि नाशिक, सातारा व कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं पुढील 48 तासांत पुणे घाट, उत्तर-पश्चिम कोकणातील भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पर्यटन किंवा अनावश्यक प्रवास टाळावा, असं अवाहन करण्यात येत आहे.
तसंच, पुणे घाटांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून पुणे शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात, विशेषतः कोकणातील जिल्ह्यांमध्ये (मुंबईसह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागात तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
22 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्हा आणि शहापूर तालुक्यात बुधवारी दुपारी 12 ते गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नाशिकच्या घाट भागात बुधवार आणि गुरुवारी अतिमुसळधार पाऊस पडेल.
खडकवासला धरण 73 टक्के भरले
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे…त्यात धरण आज सकाळी 7 वाजता 73 टक्के भरले आहे. पुढील काही तासांत धरण 80 टक्क्यांहून अधिक भरल्यास सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने नदीपात्रात न जाण्याचे, जनावरे व साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
