लग्नात गाण्यासाठी बोलवून गायिकवर बलात्कार, अत्याचार करताना बनवला व्हिडिओ

बिहारची राजधानी पाटणा येथे एका २८ वर्षीय गायिकेसोबत सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणाच्या रामकृष्ण नगर भागातील तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने सांगितले की, मी कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटली आणि दुसऱ्या खोलीत पळून माझा जीव वाचवला. पीडितेने सांगितले की, मी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जहानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती एक लोककलाकार आहे जी लग्न, वाढदिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाते. पीडितेनुसार, पिंटू कुमार, संजीव कुमार आणि कारू कुमार नावाच्या तीन तरुणांनी तिला लग्नाच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी बोलावले होते. पीडितेने सांगितले की, मी जेव्हा लग्नमंडपात गेली तेव्हा तेथे असा कोणताही समारंभ नव्हता. हे पाहून मी थक्क झाली. मी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी माझ्याकडे बंदूक दाखवून मला एका खोलीत ओढले आणि माझ्यावर बलात्कार केला. आरोपींनी बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओही बनवला.

राम कृष्ण नगर पोलीस स्टेशनचे एसएचओ रवी रंजन म्हणाले, “माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि पीडितेची सुटका केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान आरोपी पिंटू कुमार पीडितेला ओळखत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने तिला लग्न समारंभात गाण्यासाठी बोलावले होते. आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रंजन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *