राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट कायम आह़े या भागांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भात उष्णतेची लाट आणि देशातील उच्चांकी तापमान कायम आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत तापमानात वाढ झाल्याने होरपळ वाढली आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशपासून विदर्भापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भासह या सर्व भागांतील कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, तमिळनाडू आदी राज्यांतील तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर आहे. देशातील उष्णतेच्या लाटेच्या सर्व भागांमध्ये आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा आणखी तीन दिवस वाढलेला राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, राजस्थान आणि उत्तर- मध्य प्रदेशमध्ये १२ मेपर्यंत, उत्तर महाराष्ट्रात ९ मेपर्यंत, तर हरियाणा, दिल्ली, पंजाब आदी राज्यांत १२ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. रविवारी (८ मे) विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांतही तापमानाचा पारा ४४ अंशांपुढे होता. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे ४० अंशांपुढे, तर परभणी आणि नांदेड येथे ४१ अंशांपुढे तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात रविवारी तापमानात काही प्रमाणात वाढ झाली. पुणे शहरात हंगामात दुसऱ्यांदा तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान नोंदविले गेले. मुंबई परिसरासह कोकण विभागात मात्र सर्वत्र तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे.
