भामरागड तालुक्यात माओवाद्यांशी चकमक

छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नेलगुंडा-धोडराजदरम्यान झालेल्या चकमकीत सी-६० जवान जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

राकेश उपाध्याय, असे जखमी जवानाचे नाव आहे. भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवाद्यांच्या हालचाली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर सी-६० जवानांच्या दोन तुकड्या या भागात पाठविण्यात आल्या. सकाळच्या सुमारास नेलगुंडा-धोडराजदरम्यान जवान अभियान राबवित असतानाच दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. जवानांचा दबाव वाढल्यानंतर माओवादी जंगलाचा आसरा घेऊन पसार झाले. पण, राकेश उपाध्याय हे जखमी झाले. याविषयीची माहिती मिळताच गडचिरोलीवरून भागरागडला हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. नंतर जवानाला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता जवानाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *