मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने आज २९ एप्रिल रोजी राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यास सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राणा पती-पत्नीविरोधात चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आली असून कोर्टात पोलिसांकडून या दोघांच्या जामिनाला कडाडून विरोध केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतं, असं सांगत पोलिसांकडून त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं समजते. कोर्टाच्या सूचनेनंतर सरकारकडून राणा दाम्पत्य प्रकरणावर आज उत्तर दाखल केलं जाईल. मात्र कोर्टाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी कोर्टाकडून राणा दाम्पत्याला दिलासा देण्यात येतो की जामीन अर्ज फेटाळला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज केला होता. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर सुनावणी होणं बाकी असतानाही त्यांनी सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.
