कर्जत, कसारा घाट क्षेत्रांत सीसीटीव्ही ; अपघात, दरड कोसळण्याच्या घटनांवर लक्ष

घाट क्षेत्रांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे एखादी दुर्घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत, कसारा घाट क्षेत्रांत असुरक्षित ठिकाणी आणखी १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरे बसवण्याचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

गेल्या वर्षी पावसाळय़ात टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळादरम्यान घाटक्षेत्रात दरडी कोसळल्या होत्या. रेल्वे रुळांवर मोठय़ा प्रमाणात माती, रेती वाहून आली. डोंगरावरून आलेल्या वाहत्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रुळांखालील खडी आणि काही ठिकाणी रुळही वाहून गेले. घाटातील पंधरा ते वीस ठिकाणी मोठे नुकसान झाले. या घटनेत घाट क्षेत्रात काही मेल, एक्स्प्रेसही अडकल्या होत्या. त्यांना पुन्हा इंजिन जोडून जवळच्या स्थानकात नेण्यात आले. या घटनेमुळे पुणे व अन्य मार्गाने जाणारी लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली.

यंदा मध्य रेल्वेने पावसाळापूर्व तयारी सुरू केली असून कर्जत, कसारा घाटक्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले आहे. दरड रुळावर येऊ नयेत यासाठी ठिकठिकाणी संरक्षक जाळय़ा लावण्याची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाय गस्ती पथकेही तैनात केले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. याशिवाय गेल्या वर्षी झालेले नुकसान व दरडींमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पाहता मध्य रेल्वेने घाट क्षेत्रातील असुरक्षित ठिकाणी १४५ सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे बसवण्याचे काम जून महिन्यापर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण होईल. कॅमेराची यंत्रणा हाताळण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. दरडी कोसळू नयेत यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. मात्र, दुर्घटना झाल्यानंतर अडकलेल्या गाडय़ा मार्गस्थ करण्यासाठी, वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी कॅमेरा हा देखील एक चांगला पर्याय ठरणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पावसाळय़ात घाट क्षेत्रात एखाद्या ठिकाणी दरड कोसळत असेल तर त्या ठिकाणी असलेला कॅमेरा ते कैद करेल आणि नियंत्रण कक्षात उपस्थित कर्मचारी याची माहिती त्वरित रेल्वे प्रशासनाला देऊ शकतील. त्यामुळे त्यामार्गे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस आधीच थांबविता येणे शक्य होईल. तसेच घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांना त्वरित पाठवताही येईल. यातून मोठी दुर्घटना टाळता येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *