बलात्काराच्या आरोपांत कारागृहात असलेले स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शाही वागणूक देण्यात येत असून, त्यांची दररोज 30 ते 40 मिनिटे मसाज केली जात असल्याचे समोर आले आहे.
जोधपूर कारागृहातून नुकतीच सुटका झालेल्या राजस्थानमधील एका मंत्र्यांने याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. आसाराम बापू हे 15 वर्षांच्या मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणात कारागृहात आहेत. न्यायालयाने अनेकवेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कारागृहात असूनही त्यांना शाही वागणूक मिळत असल्याचा खुलासा झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूंना कारागृहात झोपण्यासाठी चांगल्या दर्जाच्या गाद्या आहेत. त्यांचे कपडे रोज धोब्याकडून धुवून आणले जातात. आसाराम यांना बराकबाहेर फिरण्याचीही परवानगी दिली जाते. त्यांच्या पूर्ण शरीराचे दररोज 30 ते 40 मिनिटे मसाज केले जाते. त्यासाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला आहे. त्यांची पूर्ण काळजी घेण्यासाठी पाच जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आसाराम बापू कारागृहात आपला जास्तीत जास्त वेळ बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांसोबत घालवितात.

