उत्तर काश्मीरमधील हंदवाडाजवळील विलगम भागात आज (गुरुवार) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे. तर, चार दहशतवादी ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलगम भागातील जंगल क्षेत्रात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, निमलष्करी आणि पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहिम सुरू केली होती. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या मध्ये एक जवान हुतात्मा झाला. तर, सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
बुधवारी सकाळीही सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला होता. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. त्याची ओळख पटली असून, त्याचे नाव रियाझ अहमद असे आहे. अहमद हा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता.
