शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा झालेली निर्घृण हत्या ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या मुळाशी जाऊन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी येथे दिली. तत्पूर्वी त्यांनी बियाणी परिवाराचे सांत्वन करून तपासाबाबत त्यांना आश्वस्त केल्यानंतर (कै.) संजय यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकही गठीत करण्यात आले.
संजय बियाणी यांची मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानासमोर दोन हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केल्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात बोकाळलेले खंडणीराज तसेच व्यावसायिकांना लक्ष्य करण्याचे वाढलेले प्रकार याविरुद्ध तीव्र सूर उमटला. व्यापारी आणि व्यावसायिकांच्या वेगवेगळय़ा संघटनांनी या हत्येचा निषेध नोंदवत बुधवारी आपले व्यवहार बंद ठेवले. संजय बियाणींच्या मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक हितचिंतकांनी आधी घेतला होता. बुधवारी सकाळी बियाणी यांच्या घरासमोर जमलेल्या जनसमुदायाने पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध घोषणाबाजीही सुरू केली होती. त्याचवेळी अनिता बियाणी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर नापसंती व्यक्त केली. माझ्या पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्यास तसेच मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती.
एका बाजूला शोकमग्न तर दुसऱ्या बाजूने संतप्त अशा वातावरणात सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे बियाणी यांच्या ‘राज’ या निवासस्थानी आगमन झाले. संजय यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर चव्हाण यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, व्यावसायिक दिनेश बाहेती प्रभृतींसह बियाणी परिवाराशी एका खोलीत सविस्तर चर्चा केली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणात कोणतीही हयगय न करता मारेकऱ्यांना पकडण्यात येईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आपण आजच बैठक घेणार आहोत, असे पालकमंत्री यांनी या वेळी स्पष्ट केले. सुमारे ३० मिनिटांच्या चर्चेनंतर बियाणी परिवाराचे समाधान झाले. त्यानंतर सकाळपासूनचा ताणतणाव संपुष्टात आला. दरम्यान, या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाडाभर उमटले. औरंगाबाद, बीड येथे मारेकऱ्यांना पकडण्यासाठी आंदोलनही करण्यात आले.
संजय बियाणी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्यात आले. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. राजकारण, उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांतील बियाणी यांच्या हितचिंतकांचा त्यात समावेश होता. खासदार चिखलीकर मंगळवारी मध्यरात्रीच येथे दाखल झाले तर पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबई-हैदराबाद मार्गे सकाळी येथे पोहोचले. बियाणी यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या समुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट करून त्यांना शांत केले. नंतर अंत्यसंस्कारप्रसंगी मंत्री चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते, व्यापारी मोठय़ा संख्येने हजर होते.
गृहमंत्र्यांशीही चर्चा होणार
मुंबई येथे उद्या मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याने घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
संजय बियाणी यांची अंत्ययात्रा वजिराबाद चौकातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोहोचताच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या कोलंबी येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी मारेकऱ्यांना अटक केली जाईल असे आश्वासन दिले, त्यामुळे तणाव निवळला.
तर समाज रस्त्यावर उतरेल : खा. चिखलीकर
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी का केली नाही, असे म्हणत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. येत्या पाच दिवसांत मारेकऱ्यांसह हत्येमागील मुख्य सूत्रधारास अटक झाली नाही तर, समाज रस्त्यावर उतरेल, भारतीय जनता पार्टी या आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा खासदार चिखलीकर यांनी दिला.
