पुसद-यवतमाळ बसला ट्रकची धडक ; एक ठार, २५ प्रवासी जखमी

पुसदहून अमरावतीकडे जाणाऱ्या बसला यवतमाळ- अमरावती मार्गावरील शिंगणापूर फाटा (ता. नांदगाव खंडेश्वर) चौफुलीवर भरधाव ट्रकची जोरदार धडक लागली. या अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.

 औरंगाबादवरून भरधाव वेगाने नागपूरकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच १६, एवाय ९७६७)ची पुसदहून अमरावतीकडे जाणाऱ्या बस (एमएच ४०, वाय ५९२६)ला जोरदार धडक लागली. अपघात घडल्यानंतर ट्रकने बसला २०० फूट फरफटत नेले. या अपघातात बसमधील पांडुरंग खुशालराव बोडखे (६५) हा प्रवासी जागीच ठार झाला. तर बसचालक मेहमूदखान मिरआलम खान व वाहक प्रेमदास कंसनदास चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले. बसमधील इतर २३ प्रवासी अपघातात जखमी झाले. अनेकांना जबर मुकामार लागला. अपघातानंतर चौफुलीवरील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नांदगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यवतमाळ येथील राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *