टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 6 लाखांची हार्ले डेव्हिडसन घेऊन चोरटा पसार

टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 6 लाखांची हार्ले डेव्हिडसन घेऊन चोरटा पसार

टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने सहा लाखांच्या हार्ले डेव्हिडसन बाईकची चोरी झाल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स शो रुमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

मोटारबाईकची आवड असलेला एक तरुण शो रुमध्ये आला. त्याने हार्ले डेव्हिडसन बाईक टेस्ट ड्राईव्हसाठी घेतली आणि चक्क कर्मचाऱ्यांसमोरच बाईक घेऊन पसार झाला.

सय्यद ताहीर असं या चोरट्याचं नाव आहे. 25 वर्षीय सय्यद मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास शोरुमध्ये आला. सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचं त्याने सांगितलं. मला हार्ले डेव्हिडसन खरेदी करायची आहे, त्यामुळे बाईकची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

शोरुमध्ये इतर बाईक पाहिल्यानंतर त्याची नजर हार्ले डेव्हिडसनच्या स्ट्रीट 750 मॉडेलवर थांबली.  या मॉडेलची किंमत सहा लाख रुपये आहे.

सय्यद ताहीरने हार्ले बाईकच्या टेस्ट ड्राइव्हची विनंती केली. ताहीर हुशार आणि जंटलमन दिसत असल्याने शोरुम कर्मचाऱ्यांनी जास्त विचार न करता त्याची विनंती मान्य केली, असं बंजारा हिल्सचे पोलिस निरीक्षक पी मुरली कृष्णा म्हणाले.

‘टेस्ट ड्राईव्ह’ प्रक्रियेचा भाग म्हणून, स्टोअर अधिकाऱ्याने वाहन परवान्यासह क्रेडिट कार्ड दाखवण्यास सांगितलं. टेस्ट ड्राईव्ह पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैस देईन असंही ताहीरने सांगितलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सय्यद ताहीरचा मोबाईल नंबर घेतला. मात्र जुबली हिल्समधील त्याच्या पत्ता नीट तपासला नाही, असंही निरीक्षक कृष्णा यांनी सांगितलं.

शोरुम ते ज्युबली हिल्स चेकपोस्ट या मार्गावर ताहीरची टेस्ट ड्राईव्ह होती. बाईक सुरु केल्यानंतर ताहीरने शो रुमसमोरील सागर सोसायटी टी जंक्शन इथून यू-टर्न न घेता थेट नागार्जुन सर्कल दिशेने गेला.

दुकानातील कर्मचाऱ्याने चोरट्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ताहीर त्याला चकवा देत तिथून पसार झाला. कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग केला पण वाहतूक सिग्नलजवळ अडकल्यामुळे चोरट्याने धूम ठोकली.

शो रुममधील कर्मचारी तासभर सय्यद ताहीरची वाट पाहत बसले. पण तो न परतल्याने शो रुमच्या व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार केली आणि सय्यदचे सीसीटीव्ही फूटजे त्यांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 380 (चोरी) आणि कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

चोरी झालेल्या बाईकमध्ये जीपीएस ट्रॅकर नसल्याचं शो रुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. चोरट्याच्या शोधासाठी पथकांची स्थापना केली आहे, परंतु त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *