अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे भीषण अपघात, एकावर एक ६० गाड्या आदळल्या

अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झालाय. बर्फामुळे झालेल्या अंधुक वातावरणात समोरचं काहीही दिसू न शकल्यानं एकावर एक अशा जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झालेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या गाड्यांची संख्या ४० ते ६० असून बऱ्याचशा गाड्यांचं मोठं नुकसानही झालंय.

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियातून समोर आलाय. बर्फवृष्टीमुळे महामार्गावर अंधुकता पसरल्यानं चालकांना समोरच्या धोक्याचा अंदाज आला नाही आणि या गाड्या एकमेकांवर आदळल्याचं या व्हिडिओतून दिसून येतंय. हा अपघात इतका भीषण होता की आपला जीव वाचवण्यासाठी चालक आणि गाड्यांतील प्रवाशांनी गाड्या रस्त्यातच सोडून बाजुला पळ काढला.

हा संपूर्ण रस्ता डोंगराळ भागातील आहे. या अपघाताचा फटका बसलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्चुयलकिल काउंटीमध्ये ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे जवळपास पाच वाहनांनी पेट घेतल्याचं सांगण्यात येतंय.

अपघातातील जखमींना जवळच्या वेगवेगळ्या चार रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय. सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीनं आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले. या भीषण अपघाताचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आतापर्यंत २० लाख वेळा पाहिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *