महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत खोटी प्रमाणपत्र सादर करुन शासनाची कोटयवधी रुपयांना फसवणूक केल्याचं प्रकरण मुंबईत उघडकीस आलं आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह तब्बल 22 अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेष म्हणजे तब्बल 19 कंत्राटदारांनाही काळया यादीत टाकण्यात आलं आहे.
उत्तर मुंबई विभागातील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्य विभागातील देयकांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असून यातून आणखी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंधेरी विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कामामध्ये अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोटयवधी रुपयांच्या बिलांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

