सरकार दरबारी कोणतीही नोंद नसताना शहरात जोरात वाढत असलेल्या ओला आणि उबेर या मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सीविरोधात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या ‘स्वाभिमन’ टॅक्सी युनियनने पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. या संपात शेकडो टॅक्सीचालकांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला.
शहरात धावणा-या ‘ओला’ आणि ‘उबेर’ या मोबाईल अॅप बेस टॅक्सीची कोणत्याही सरकारी कार्यालयात नोंद नाही. तरीही या कंपन्या प्रवासी वाहतूक करत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप स्वाभिमान टॅक्सी रिक्षा युनियनने केला होता. त्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले.
आठ ते दहा हजार टॅक्सीचालक या संपामध्ये सहभागी झाले होते. पश्चिम उपनगरातील रिक्षाचालकही या संपात सहभागी झाले होते. मात्र काही विरोधकांकडून काही ठिकाणी टॅक्सींची तोडफोड झाल्याच्या अफवा पसरवण्यात येत होत्या.
या अफवांवर विश्वास न ठेवता अनेक टॅक्सीमालक, चालकांनी टॅक्सी रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच हा संप यशस्वी झाला. मुंबई व उपनगरात खासगी कंपनीच्या वाहनांना केवळ पर्यटन वाहतुकीची परवानगी आहे. या टॅक्सी मान्यताप्राप्त टॅक्सीप्रमाणे प्रवाशांकडून किलोमीटरच्या दरात भाडे आकारत आहेत.
याकडे राज्य सरकारसह संबंधित प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्वाभिमान टॅक्सी युनियनने संप पुकारल्याचे स्वाभिमान टॅक्सी युनियनचे मुंबई प्रदेश अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले. तसेच ओला आणि उबेर टॅक्सीवर बंदी घालण्याचा निर्णय होणार नाही. तोपर्यंत स्वामिमान टॅक्सी युनियनचा संप बेमुदत सुरू राहणार असल्याचेही तिवारी म्हणाले.
दरम्यान, स्वामिमान टॅक्सी संघटनेचा हा संप अयशस्वी प्रयत्न काही कर्मचा-यांनी केला. मात्र, स्वाभिमानचे टॅक्सीचालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे हा ‘स्वाभिमान’चा संप पूर्ण यशस्वी झाला.

