ताडी विक्री परवानगीविरोधात महिला विडी कामगार रस्त्यावर

यापूर्वी सर्रास विषारी ताडीची विक्री झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी शासनानेच बंदी घातलेली ताडी विक्रीसाठी पुन्हा शासनाने परवाने दिले आहेत. त्यास सार्वत्रिक विरोध होत आहे. याच मुद्दय़ावर महिला विडी कामगारांनीही रस्त्यावर उतरून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यासमोर तीव्र निदर्शने केली.

अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुलात हजारो विडी कामगारांच्या कुटुंबीयांना ताडी विक्रीचा प्रचंड त्रास होणार आहे. या विषारी ताडीमुळे आजमितीस शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. व्यसनाधीन तरुणांमुळे ऐन तारुण्यात महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. काही वर्षांपूर्वी ताडी विक्रीच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्यामुळे सर्व ताडी विक्री केंद्रे शासनाच्या आदेशानुसार बंद होती. त्यानंतर आता पुन्हा अचानकपणे शासनाने ताडी विक्रीसाठी परवाने दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी ताडी विक्री अधिकृतपणे सुरू होऊ शकते. विकली जाणारी ताडी शुध्द नसते. तर रासायनिक द्रव्यांची भेसळ करून कृत्रिमपणे ताडी तयार केली जाते. ही ताडी विषारी, आरोग्याला घातक आणि जीवघेणी असल्याचा आक्षेप घेतला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *