राज्यातील दुर्बल घटक, मजूर, कामगार, झोपडपट्टीतील नागरिक आणि गरीब रहिवाशांच्या घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘ आपला दवाखाना ’ला टाळे लागले आहे. १ नोव्हेंबरपासून शहरातीलच नव्हे, तर राज्यभरातील सर्व ‘आपला दवाखाना’ क्लिनिक बंद असून, दैनंदिन औषधांसाठी हेलपाटे मारणाऱ्या रुग्णांना निराशेने परतावे लागत आहे.
कंत्राटदाराने क्लिनिक बंद करण्याचा निर्णय
गरिबांना आरोग्य सेवा मोफत देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यभरात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. कल्याणमध्ये ५४, तर उल्हासनगरमध्ये सात क्लिनिक आहेत. या क्लिनिकमध्ये १०५ प्रकारची औषधे, ३० प्रकारच्या चाचण्या, गरोदर मातांची तपासणी, लसीकरण यांसारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या खर्चाचा भार राज्याच्या तिजोरीतून उचलला जात होता. राज्य सरकारने ही क्लिनिक चालविण्यासाठी ‘एचएलएल’ या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली. त्यांच्या माध्यमातून या सर्व क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, तपासणी उपकरणे आणि औषधे पुरवली जाणे अपेक्षित आहे. मात्र हे दवाखाने चालविण्यासाठी राज्य सरकारकडून ठरवलेले मानधन मागील सहा महिन्यांपासून न दिल्याने कंत्राटदाराने क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णांनी संतापही व्यक्त केला.
या दवाखान्यांत १०६ प्रकारची औषधे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात १० ते १५ प्रकारची औषधेच या क्लिनिकमधून उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. ही क्लिनिक सुरू झाल्यापासून आतापर्यंत येथे खोकल्याचे औषध, ॲसिडिटीवरील औषधे, टीटीसारखी इंजेक्शन्स, उलटी-जुलाबावरील औषधे मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. जितकी औषधे सरकारकडून पाठवली जातात, त्याच औषधांचा क्लिनिकमधून रुग्णांना पुरवठा केला जात होता. सरकारकडून जी औषधे उपलब्ध करून दिली जात नाहीत, ती औषधे कुठून देणार, असा प्रश्न क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केल्याने रुग्णांनी संतापही व्यक्त केला.
क्लिनिकमध्ये रुग्णांची हेळसांड सुरू
या क्लिनिकमध्ये रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप होत आहे. या क्लिनिकचे २०२३मध्ये उद्घाटन करण्यात आले. मात्र, या क्लिनिकमध्ये उपचार घेणारे रुग्ण गरीब असल्याने या सुविधेकडे सरकारचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून हे क्लिनिक चालविण्यासाठी सरकारने ठरवून दिलेला मोबदला थकला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारने थकलेला मोबदला दिलेला नसल्यानेच १ नोव्हेंबरपासून क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत सरकारसह स्थानिक आरोग्य विभागांना कळविण्यात आल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात आले. यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण
क्लिनिक बंद असल्याच्या तक्रारीची दखल घेत सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार संबंधित कंत्राटदाराला तत्काळ क्लिनिक सुरू करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, रुग्णांच्या सोयीसाठी सर्व क्लिनिकबाहेर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा तसेच पालिकेच्या रुग्णालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
