नाशिकमध्ये एक धक्कादायक तथा संतापजनक घटना समोर आली आहे. पतीकडून पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला असून संशयित पती आकाश जाधव याला याला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या पेठरोड परिसरातील आर.टी.ओ. कॉर्नर परिसरात असलेल्या कोमल सोसायटी येथे पूजा आणि आकाश जाधव हे दोघे पती पत्नी वास्तव्यास होते. आकाश हा रिक्षा चालवून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पती आकाश याला पत्नी पूजा हिच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणाने दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनेकवेळा संशयित आकाश याच्याकडून मयत पूजा हिला चारित्र्याच्या संशयातून मारहाण देखील केली जात होती.
पत्नीच्याच ओढणीने गळा आवळला
१५ दिवसांपूर्वी याच कारणाने झालेल्या वादामुळे मयत पूजा हिने कंटाळून तिचा पती आकाश याला घरात कोंडून देखील ठेवले होते. त्यानंतर देखील त्यांच्या दोघांमध्ये सतत वाद होतच होते. यातच काल गुरुवारी रोजी आकाश याने पूजा हिच्याकडे तिचा मोबाईल मागितला. मात्र, पूजा हिने मोबाईल देण्यास नकार दिला. या कारणाने पुन्हा आकाश आणि पूजा यांच्यात वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. संशयित आकाश याने पूजा हिच्याच ओढणीने तिचा गळा आवळत तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि म्हसरूळ पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करत या प्रकरणी संशयित आकाश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील महिलेसोबत दुबईत धक्कादायक प्रकार
पुण्यातील महिलेसोबत दुबईत भयंकर प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये नोकरी आणि महिन्याला सव्वा लाख रुपये पगाराच्या आमिषाने दुबईत देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या महिलेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुखरूप सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालय, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि ‘आयपीएफ महाहेल्पलाइन’च्या मदतीने या महिलेला मायदेशी आणण्यात आले. नोकरीच्या आमिषाने महिलांची फसवणूक आणि शोषण करणारी मोठी परदेशी टोळी सक्रिय असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली.
