मुदत संपलेल्या पासमध्ये AIने फेरफार; टीसीच्या नजरेने हेरलं, विरारच्या तरुणाला अटक

वैधता संपलेल्या रेल्वे पासमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने फेरफार करून एसी लोकलमधून प्रवास केल्याचा प्रकार पश्चिम रेल्वेवर उघडकीस आला आहे. तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे बनावट पासचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विरार येथे राहणाऱ्या अमन यादव याला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने चॅटजीपीटीच्या मदतीने पासमध्ये फेरफार केल्याची माहिती दिली.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेले प्रशांत साहू हे २ नोव्हेंबरला दुपारी २ ते रात्री १० या वेळेत एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी करत होते. त्यांच्यासोबत अरविंद सिंग हेही कर्तव्यावर होते. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांनी तिकीट तपासणी सुरू केली. वसई रोड स्थानक येण्यापूर्वी विरारच्या दिशेकडील पाचव्या डब्यात बसलेल्या अमन यादव याच्याकडे साहू यांनी तिकीट किंवा पासची मागणी केली.अमनने रेलवन ॲप मधील पासचा भ्रमणध्वनीवरील छायाचित्रित पडदा दाखवला. या पासवर ३ ऑक्टोबर २०२६ ते २ मार्च २०२७ अशी वैधता नमूद होती. मात्र, पासबाबत संशय आल्याने साहू यांनी अमनला वसई रोड स्थानकात उतरवून तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात नेले. चौकशीदरम्यान अमनने हा पास स्वतःचाच असून मित्राने रेलवन ॲपवरून काढून दिल्याचे सांगितले.

यंत्रणेतील तपासणीत बनावटगिरी उघड
तिकीट तपासनीसांनी पासवरील क्रमांक रेल्वेच्या तिकीट तपासणी यंत्रात टाकून तपासला. त्यावेळी संबंधित क्रमांकाचा पास विरार ते बोरिवली या मार्गावरील प्रथम श्रेणीचा असून, त्याची वैधता ३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर अशीच असल्याचे यंत्रणेतील नोंदीतून स्पष्ट झाले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता अमनने पासमध्ये फेरफार केल्याचे कबूल केले. तिकीट तपासनीसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अमनला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *