प्रेमात अडसर, अल्पवयीन प्रेयसीच्या 30 वर्षीय मामीची हत्या, आरोपी प्रियकर म्हणतो, माझ्याआधी ती कोणालातरी भेटलेली

प्रेमात अडसर ठरत असल्याच्या संशयातून अल्पवयीन प्रेयसीच्या मामीची हत्या करणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकावर अटक केली. अक्षय शालिकराम करोटे (वय ३०, रा. नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रियंका असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रेयसीच्या मामीचं अपहरण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयने प्रियंकाचे अपहरण करून तिला मारहाण केली. त्यानंतर तिला घरी सोडले. दरम्यान, प्रियंकाची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान प्रियंकाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच अक्षय पसार झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अक्षयचा शोध सुरू केला होता.

वर्धा रेल्वे स्थानकावर सापळा

नागपुरातून फरार झाल्यानंतर अक्षय मुंबईला गेला. तेथून तो पुण्याला गेला आणि काही दिवस तेथेच थांबला. बुधवारी रात्री तो पुण्याहून रेल्वेने नागपूरकडे येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांना मिळाली. त्यानंतर राव आणि साहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने, साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप होळगे, उपनिरीक्षक प्रदीप काइट, संतोष रामलोड, दिनेश, सोमेश्वर गुगल, राहुल खडतकर, संतोष चौधरी, रोहन आणि महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल स्वाती ठाकूर यांच्या पथकाने वर्धा रेल्वे स्थानकावर सापळा रचला.

पुण्याहून येणारी रेल्वे वर्धा स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी अक्षयला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

 

माझ्याआधी ती कोणालातरी भेटली होती

‘मी प्रियंकाचे अपहरण केले नाही आणि तिला मारहाणही केली नाही. मी तिला सोबत नेले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर आधीच जखमा होत्या. तिने मला वाठोडा भागात नेण्यास सांगितले. तेथे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने आम्ही दोघे खाली पडलो. मी तिला घरी सोडल्यानंतर ती क्लिनिकमध्ये गेली होती. मात्र, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिने उपचार घेतले नाहीत. माझ्याआधी ती कोणालातरी भेटली होती,’ असा दावा अक्षय पोलिसांसमोर करीत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *