ई-सुविधा तरीही ‘ऑफलाइन’ बाजार! महाराष्ट्रात 12 वर्षांत लाचखोरीचे 10 हजार गुन्हे; 9 हजार 987 सापळ्यांची नोंद

‘ई-सुविधां’च्या नावाखाली सरकारचे बहुतांश विभागात डिजिटल कामे होत असली, तरी राज्यात लाचखोरीचा ‘ऑफलाइन बाजार’ अद्याप तेजीत असल्याचे वास्तव आहे. सन २०१४ ते आतापर्यंत या १२ वर्षांत महाराष्ट्रात भ्रष्टाचारविषयक तब्बल १० हजार ३७८ गुन्हे दाखल असून, त्यात नऊ हजार ९८७ लाचेच्या सापळ्यांची नोंद आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज, डिजिटल मंजुरी आणि ई-प्रशासनाच्या घोषणा वाढल्या तरीही नागरिकांची कामे पुढे सरकवण्यासाठी ‘टेबलाखालील’ व्यवहारांची साखळी दुर्दैवाने अजूनही मजबूत असल्याचे अधोरेखित होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नोंदीनुसार सन २०१४ आणि २०१५मध्ये कारवायांचा उच्चांक होता. सन २०१४मध्ये एक हजार ३१६, तर सन २०१५मध्ये एक हजार २७९ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर कारवाईचा आलेख काहीसा खाली आला. सन २०२०मध्ये करोनामुळे सरकारी कामकाज मर्यादित राहिल्याने गुन्ह्यांची संख्या ६६३पर्यंत घसरली. मात्र, लॉकडाउननंतर पुन्हा कारवायांना वेग आला. सन २०२३मध्ये ८१२, २०२४मध्ये ७२१, तर २०२५मध्ये ६८० गुन्हे नोंद झाले. सन २०२६ मध्ये आतापर्यंत ६३५ गुन्हे दाखल असून, त्यात ६१२ सापळे आहेत. त्यामुळे वर्षाखेरीस हा आकडा गेल्या वर्षाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *