अकोला शहरातील सराफाबाजाराजवळ असलेल्या एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना काल सोमवारी रात्री घडली असून या आगीत एका व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तसेच एक महिला गंभीररित्या भाजली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला शहरातील सराफाबाजार परिससरातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्यानं आग आणखी जास्त भडकली नाही. काही वेळाने आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अचानक लागलेल्या या आगीत घरातील ६५ वर्षीय वृद्ध गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सराफा बाजारातील घराला रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता, आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये घरात राहणारा ६५ वर्षीय इकबाल हुसैन गुलाम हुसैन यांचा मृत्यू झालाय. यासोबतच घरातील साहित्य जळून खाक झालंय. गंभीर भाजलेल्या इकबाल हुसैन याला नागरिकांनी सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
