आवश्यक परवानगीनंतरच जतमध्ये शिवपुतळय़ास मान्यता

जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानगीनंतरच मान्यता दिली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सांगितले.  जतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात शिवपुतळय़ाची हानी झाली होती. यामुळे नवीन पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुतळा बसविण्यासाठी चबुतराही उभारण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी शिवपुतळय़ाची प्रतिष्ठापनाही निश्चित करण्यात आली होती. मात्र पुतळा बसविण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी प्रतिबंध केला होता. रविवारी मिरजेतील कार्यशाळेतून वादंगानंतर जतमध्ये शिवपुतळा नेण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप, पुतळा समितीचे सदस्य, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  पुतळा बसविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार २०१७ पासून स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुतळा बसवत असताना राष्ट्र पुरूषाचा योग्य  सन्मान राखला जावा यासाठी पुतळा समितीने न्यायालय व शासनाच्या मार्गदर्शक नियमांची व विविध परवानगीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.  जतमध्ये लवकरात लवकर पुतळा बसवा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक गेडाम यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *