समाजमाध्यमांवर अनोळखी मुलींशी मैत्री करणे महागात पडू शकते आहे. जिल्ह्यात ५० हून अधिक जणांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेसबुकचा वापर करताना खबरदारी घ्या, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
समाजमाध्यमांचा वापर करून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणांची शंभर टक्के उकल करणे शक्य असले तरी बदनामीच्या भीतीने अशा प्रकरणात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी समाजमाध्यमांचा वापर करताना योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. फेसबुकचे बनावट खाते तयार करून पैशाची मागणी करणे, तसेच मैत्रीच्या आडून अश्लील चॅटिंग करून बदनामीची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. फेसबुक तसेच इतर समाजमाध्यमांवर अनोळखी तरुणीकडून मैत्रीची रिक्वेस्ट पाठविली जाते. बरेचदा तरुण मुले या रिक्वेस्ट स्वीकारतात. नंतर चॅटिंग आणि व्हिडीओ कॉिलग सुरू होते. यात व्हिडीओ कॉिलगदरम्यान अश्लील चाळे करण्यास उद्युक्त केले जाते.
नंतर या सर्व व्हिडीओ कॉिलगचे चित्रीकरण करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. त्यासाठी मोठी रक्कम उकळण्यात येते. गेल्या काही दिवसांत अशा पद्धतीने आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत; पण बदनामीच्या भीतीने पोलीस तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. अलिबागमध्ये दोघांची अडीच लाखांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
‘फेसबुकवर मैत्री करून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक जण या मोहजाळय़ात अडकले असून आर्थिक फसवणुकीला बळी पडले आहेत. त्यामुळे फेसबुकवर येणाऱ्या अशा मैत्रीच्या रिक्वेस्ट स्वीकारू नका. आपण फसले गेल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर सेलकडे तक्रार करा. पोलीस नेहमीच आपल्या पाठीशी आहेत. फेसबुकवर प्रोफाइल लॉक करून ठेवणे गरजेचे आहे.’
– राजन जगताप, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, रायगड
