भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! ठाण्यातील बॅनर्समुळे राजकीय चर्चेला उधाण

आजारपणामुळे बराच काळ घरातून बाहेर न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम विरोधकांच्या निशाण्यावर असतात. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी तब्बल अडीच महिन्यानंतर घरातून बाहेर पडले होते. कालच ते लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कमध्येही आले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज काही काळासाठी शिवसेनेतील दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. परंतु, मुख्यमंत्रीपदाचा कारभार उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. परंतु, आता ठाणे शहरात लागलेल्या काही बॅनर्समुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख खरंच मुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवायचा विचार करत आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीत खरंच खांदेपालट होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यात हॉट फेव्हरिट मानले जात होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र, ठाण्यातील बॅनर्समुळे पुन्हा एकदा नवी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले. या पोस्टरमध्ये शिंदेच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख अनेकांच्या नजरेत भरणार आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी अजूनही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

१२ नोव्हेंबरला मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्याचा कारभार हाताळत आहेत. या काळात सर्व प्रशासकीय चर्चा, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावत होते. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. इतका काळ मुख्यमंत्री दिसत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती.
उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज तात्पुरता दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणीही भाजपच्या नेत्यांनी केली होती. अखेर २६ जानेवारीला तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे पूर्णपणे सक्रिय झालेले नाहीत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारीही आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीचा भार कितपत पेलू शकतील, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *