सांबांचा नो थांबा! वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान, तुमच्यावर आता असा आहे ‘वॉच’

 समोर ट्राफिक पोलीस दिसत नाही म्हणून बिनधास्त सिग्नल तोडणाऱ्यांनो, ही बातमी तुमच्यासाठी आहे. चौकांत पोलीस दिसत नसले, तरी गुप्त तिसऱ्या डोळ्याची बारिक नजर तुमच्यावर आहे. त्या तिसऱ्या डोळ्याने गेल्यावर्षी म्हणजेच २०२१साली १ लाख ८७ हजार नियमतोड्यांना हेरत त्यांना दंड ठोठावला आहे. तेव्हा दंडापासून स्वत:चा बचाव करावयाचा असेल तर वाहतुकीचे नियम पाळलेलेच बरे, असा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे.

उपराजधानीच्या चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचे डोळे चोवीस तास जागेच असतात. चौकात वाहतूक पोलीस असो वा नसो, कॅमेरे बरोबर ‘वॉच’ ठेवून असतात. कोन सिग्नल तोडतेय, कुणी मास्क लावला नाही. कुणी नो पार्किंगमध्ये गाडी ठेवली आहे, यावर त्याची नजर असते. तो अशा वाहनांचा क्रमांक स्कॅन करीत त्या आधारे वाहनधारकाने केलेल्या गुन्ह्याचा दंड ठोठावला जातो. यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत महापालिकेच्या नियंत्रण कक्षात हजर असतात.

तिसऱ्या डोळ्याने आकारलेल्या दंडानुसार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांत वाहतूक शाखेचे कॉटन मार्केट झोन कुख्यात असल्याचे आकडेवारी सांगते. इथे सर्वाधिक २२ हजार ५७३ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. सगळ्यात कमी कारवाया लकडगंज झोनमध्ये समोर आल्या आहेत.

सांबांचा नो थांबा!

‘अरे ओ सांबा, जरा स्टॉप लाइनच्या मागे थांबा’ असा आवाज चौकाचौकांत कानी येतो. त्याचेही पालन होत नाही. स्टॉप लाइन ओलांडणाऱ्या २ हजार ७४४ जणांना दंडीत करण्यात आले आहे. ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्या अडीच हजार, सिट ब्लेट न लावणारे ६ हजार ८१५ कारचालक, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे १ हजार ४२ चालक, नो एन्ट्रीतून वाहन चालविणाऱ्या ३ हजार १९७, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्या ४ हजार २७५ वाहनचालकांनाही पोलीसांनी चालान पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *