प्राणाघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आणि पुन्हा पकडून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असता तेथे पुन्हा गोंधळ घालत पोलिसांना चावा घेतला आणि नंतर स्वत:ला मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेम संजय हलकवडे (वय १९, रा. थोबडे वस्ती, देगाव नाका, सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी प्रेम हलकवडे यास सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असता जिल्हा कारागृहात तो आजारी पडला होता. त्यामुळे त्यास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केले होते. त्यास फौजदार चावडी पोलिसांनी शोधून काढले आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, रुग्णालयात हलकवडे याच्यावर उपचार सुरू असताना त्याने मच्छर जाळी तोडून आणि हातातील सलाईन परस्पर काढून गोंधळ घातला. तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस शिपाई अतुल राऊत आणि जाधव यांच्यावरही त्याने हल्ला केला. राऊत यांच्या उजव्या पायाच्या मांडीचा त्याने चावाही घेतला. जाधव यांना खिडकीच्या पडद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपने मारहाण केली. त्यानंतर स्वत: खिडकीत ठेवलेला दगड घेऊन स्वत:ला मारून घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
