भिवंडीची भेळ महागली

भिवंडीची भेळ महागली

यंत्रमागाची नागरी म्हणून समजल्या जाणा-या भिवंडी शहरात लाखो कामगार राहतात. आपल्या पोटाला पीळ मारून पैसे वाचवण्यासाठी आणि रोजंदारीत मिळालेल्या पैशातून बचत करून हे पैसे दूर राहाणा-या कुटुंबाला पाठवण्यासाठी हे कामगार महागडा नास्ता करत नाहीत. तो त्यांना परवडतही नाही. अशा या ‘हातावर पोट’ असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी ही ‘भेळ’च महत्त्वाची आहे. मात्र, आता तीही महागल्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे  ‘अच्छे दिन’ कामगारांसाठी प्रत्यक्षात ‘बुरे दिन’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात सुमारे ९ लाख यंत्रमाग कारखाने असून या कारखान्यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यातून लाखो कामगार यंत्रमागावर काम करत आहे. बहुसंख्य कामगारांचे कुटुंबिय त्यांच्या मूळ गावी आहेत. त्यांना गावी पैसे पाठवण्यासाठी येथील कामगार काटकसर करून शक्य तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात.

त्यासाठी पोटाला पीळ देत दोन वेळ भिशी (खानावळ) मध्ये जेवण करून पाच ते दहा जण एका लहानरूममध्ये राहून कसेबसे दिवस काढत आहेत. दिवसाला १२ ते १६ तास काम करत असलेल्या कामगारांमध्ये नास्ता म्हणून भेळ प्रसिद्ध आहे. आजपर्यंत ही भेळ त्यांना परवडतही होती. या भेळमध्ये कांदा नसतो. शेंगदाणे, वटाणे, चणे, मका, पोहे, माकापोहे हे सर्व पदार्थ ग्राहकाच्या मागणीनुसार एका मोठय़ा कढईत गरम केलेल्या मिठामध्ये भाजून सर्व मिश्रण करून लिंबू,  मिरची, आले अशी खमंग लज्जतदार बनवलेली चटणी टाकून ही भेळ तयार केली जाते.

शहरामध्ये ही भेळ बनवणा-या सुमारे ३५ हातगाडय़ा असून २५ ते ३० वर्षापासून हा व्यवसाय येथे सुरू आहे. २ ते ३ रुपयाला मिळणारी भेळ आता ५ ते १० रुपयाला मिळत आहे. कारण ५० रुपयांना मिळणारे शेंगदाणे १०० रुपये किलो, ४० रुपये चणे व आवश्यक कडधान्य महागले आहेत. तसेच भेळ बनवण्यासाठी लागणारी लागणारे इंधनही महागले आहे. त्यामुळे ‘कामगारांची भिवंडी भेळ’ दुपटीने महागली आहे.

आम्ही तीन भाऊ असून तिघेही गेल्या २५ वर्ष पासून भेळ विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. वाढत्या महागाईमुळे आठशे ते एक हजार रुपयांचा व्यावसाय आता फक्त चारशे ते पाचशे रुपयांवर आला आहे. काही कामगार तर भेळ खाऊनच आपला दिवस ढकलतात. त्यांचीही अडचण झाली आहे.

गोरगरीब, दुर्बल तसेच भिक्षेकरीही भेळ खाऊनच दिवस ढकलतात त्यांना कमी पैशात मिळणारी पोटभर भेळ महाग झाल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. असे अर्जुन गुप्ता या भेळविक्रेत्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *