राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय वरळीतील संकल्प प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला आहे.

संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक सचिन अहिर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करत उंच दहीहंडी फोडण्यासाठी दरवर्षी दहिकाला उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि न्यायालयाच्या जाचक अटींमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय वरळीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आल्याचे आयोजक सचिन अहिर यांनी सांगितले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत दहीहंडी साजरी करणे पटत नाही, असे अहिर पत्रकार परिषदेत म्हणाले.

यापूर्वी, ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसचे रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहिहंडी आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहिकाला उत्सवही यावर्षी याच कारणासाठी रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील नावाजलेली गोविंदा पथके थरांचा विक्रम रचून मोठ्या रक्कमेची पारितोषिके पटकावण्यासाठी महिनाभर कसून सराव करतात. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांनी या निर्णयावर टीका केली आहे.

तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या एक दिवसाच्या उत्सवासाठी खर्च होणारे लाखो रुपये दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *