४ महिन्यांच्या बाळाची ४ लाखांना विक्री, एका डॉक्टरचाही….

मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात ३ जानेवारीला एका महिलेने तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये लस देण्याच्या बहाण्याने आरोपी इब्राहिम शेखने २७ डिसेंबरला तिच्या घरातून बाळाला नेलं. मात्र तो परत आलाच नाही. बाळाची आई या महिलेकडे बाळाला सोडून गेली होती. आरोपी इब्राहिम आणि बाळाची आई हे दोघे लिव्ह-इनमधे राहात होते. मुंबई पोलिसांनी याबद्दलची तक्रार मिळताच, चार महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाचा आणि विक्रीचा कट उधळून लावला. या प्रकरणी ११ आरोपींना अटक केली आहे. यात तीन महिलांचाही समावेश असून, तामिळनाडूतील एक डॉक्टर देखील सामील आहे.

तपासादरम्यान आढळून आले की, तामिळनाडूतील एका जोडप्याला मूल हवे होते. त्याचवेळी एका डॉक्टरने सांगितलं की, काही रकमेच्या बदल्यात बाळ देण्यास मी तुमची मदत करेन. त्यानंतर डॉक्टरांनी रॅकेटमध्ये असलेल्या महिलांशी संपर्क साधला आणि इब्राहिम शेख यांच्यापर्यंत पोहचले. त्याने चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केलं. त्यानंतर हा व्यवहार ४ लाख ८० हजार रुपयांना ठरवला. त्यानंतर त्याने हे बाळ या रॅकेटमधील महिलांच्या ताब्यात दिले. इब्राहिम शेखने बाळाचा पिता असल्याचा दावा केला, अशी माहिती झोन २ चे पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. बाळाला त्यांनी आधी कर्नाटकला नेले होते. त्यानंतर तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यात असलेल्या एका गावात नेले. त्यानंतर मुंबईच्या व्ही. पी. मार्ग पोलिसांची एक टीम त्या गावात गेली. तामिळनाडूमधली आणखी दोन ठिकाणीही शोध घेतला. अखेर कोइम्बतूरजवळच्या सेलवानपट्टी गावात हे बाळ असल्याची माहिती मिळाली. या बाळाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तामिळनाडूतून पाच जणांना अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *