सुक्या मेव्याचा पुरवठादार असल्याचे भासवून एका भामट्याने एपीएमसी मार्केटमधील एका व्यापाऱ्याकडून तब्बल ८२ लाख रुपयांची खरेदी करून मालाची रक्कम न देता पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. अनिल राजगुरूकर असे त्याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मार्च २०२० मध्ये राजगुरुकर याने ढवळे यांच्याकडून १५ लाख ४६ हजार रुपयांचा सुका मेवा घेऊन त्याची रक्कम तीन महिन्यांच्या कालावधीत दिली होते. त्यानंतरही आणखी एकदा मालाचे पैसे ऑनलाइन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर राजगुरुकर याने जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये ढवळे यांच्याकडून एकूण ८२ लाख १० हजारांचा माल घेतला. पैशांबाबत ढवळे यांनी विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने फोन बंद करून पलायन केले.
ढवळे यांनी राजगुरुकर याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहाणी केली असता अशी व्यक्ती तेथे राहत नसल्याचे समजले. त्यानंतर ढवळे यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजगुरुकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
